पद्मालय हे ठिकाण जळगावपासून ३० कि.मी. अंतरावर आहे. येथील डोंगरमाथ्यावरील चढण संपल्यावर गणेश मंदिराच्या कळसाचे दर्शन घडते. हे मंदिर भारतातील अडीच गणेशपीठापैकी अर्धे पीठ मानले जाते.
मंदिराजवळच कमळांनी भरलेला पद्मालय तलाव आहे. मुख्य देवालयाच्या चहूबाजूस गणपतीची छोटी छोटी देवळे आहेत.
मंदिरात आमोद आणि प्रमोद अशा स्वयंभू गणेशाच्या दोन मूर्ती आहेत.
मंदिरासमोर गोविंद महाराजांच्या (गोविंदशास्त्री बर्वे) पादुका आहेत.
सन १८९५ ते १९३५ या काळात या सिद्धपुरुषाचे येथे वास्तव्य होते. त्यांनीच जुन्या देवळाचा जीर्णोद्धार करून नवीन, सुंदर व भव्य देवालय बांधले.
पादुकांच्या एका बाजूला प्रचंड मोठी घंटा आहे.
मंदिराला लागून मोठा सभामंडप आहे.
मंडपात सव्वा मीटर उंचीचा भव्य दगडी उंदीर आहे.
मंडपाच्या पुढे गर्भगृह आहे. त्यातील एक मूर्ती उजव्या व दुसरी डाव्या सोंडेची आहे.
उजव्या सोंडेची मूर्ती पद्मालय तलावात सापडली असून या दोन्ही मूर्तीना चांदीचे मुकुट चढविले आहेत.
संपूर्ण दगडी बांधणीचे हे मंदिर पूर्वाभिमुख, अतिशय भव्य व सुंदर आहे.
दर्शनी भिंतीच्या छतावर दोन प्रचंड हत्ती उभे आहेत. समोरच्या तलावाचे काठ चिरेबंदी दगडांनी बांधून त्याला घाटाचा आकार दिला आहे.
लाल व पांढऱ्या कमळांनी हा तलाव नेहमी भरलेला असतो.
तलावाच्या काठावर महाद्वाराच्या अगदी समोर पंचधातूची ४.५ क्विंटल वजनाची प्रचंड घंटा आहे. या घंटेच्या लोलकाचे वजन २० कि. ग्रॅ. आहे. पंधरा-सोळा कि.मी. परिसरात या घंटेचा आवाज ऐकू येतो.
गणेश चतुर्थीच्या मोठ्या उत्सवाव्यतिरिक्त येथे कार्तिकी पौर्णिमेलाही यात्रा भरते. या दिवशी कार्तिकस्वामी आपल्या धाकट्या भावास भेटावयास येतात अशी समजूत आहे.
माघ शुद्ध चतुर्थीला गजानन जन्मोत्सवही थाटात साजरा करतात. त्यावेळी येथे मोठी यात्रा भरते.
मंदिराच्या जवळ अनेक वनौषधी सापडतात.
मंदिराजवळून ५ कि.मी. अंतरावर नदीकाठी भीमकुंड येथे भीम-बकासुर युद्ध झाल्याचे मानतात. येथे महादेवाची पिंड असून परिसरात प्राचीन अवशेषही आढळतात.