जळगावपासून १० कि.मी.वर तरसोद येथे शिवकालीन प्रसिद्ध गणेश मंदिर आहे. सन १६६२ मध्ये हे मंदिर मुरारखेड्याच्या देशमुखांनी बांधले, अशी नोंद आहे.
श्रीक्षेत्र पद्मालयचे सत्पुरुष श्री गोविंद महाराज या गणेश मंदिरात दर्शनासाठी अनेकदा येत असत.
शेगावचे संत गजानन महाराज देखील नशिराबादच्या झिपरू अण्णा महाराजांना भेटण्यासाठी अधून-मधून येत.
दोघेही संत इथे गणपती मंदिरात येऊन काही काळ एकत्र घालवीत असत.
मराठेशाहीत आणि नंतर पेशवाईच्या काळात मराठ्यांच्या फौजा ज्या ज्या वेळी उत्तरेकडे मोहिमांसाठी जात, त्यावेळी जाताना मुरारखेड्याला थांबून या गणपतीला कौल लावून त्याचा आशीर्वाद घेऊन मग पुढे मोहिमेसाठी जात.
अनेक मातब्बर सरदार, एवढंच नव्हे, तर खुद्द पेशवे देखील तरसोदच्या गणपती मंदिरात येऊन गेल्याचे सांगितले जाते.
तरसोदचे हे मंदिर नदीच्या नव्हे, तर हातेड या नाल्याच्या काठावर आहे.
'हातेड' नाल्याला कधी-कधी प्रचंड पूर येत असे. एकदा या पुरामध्ये पेशव्यांच्या सरदारांच्या सैन्यातला एक हत्ती देखील वाहून गेला होता, असे म्हणतात. त्यावरून 'हातेड' हे नाव या नाल्याला मिळाले असावे.
मंदिराच्या नव्या बांधकामामुळे आता दिसते ती परिस्थिती अशी, की मूळ जुने मंदिर आता 'गाभारा' या स्वरूपात आले असून त्याच्या समोरच एक दगडी नंदी आणि मूषक जोडीने बसवले आहेत.
मंदिरात शंकराची पिंड नाही. गाभाऱ्यात केवळ गणपतीची मूर्ती असली तरीही बाहेर नंदी आहे! म्हणजे वडील आणि मुलगा-दोघांचीही वाहने जोडीने गाभाऱ्याबाहेर थांबली आहेत. मंदिर परिसरात चतुर्थीला भाविकांची प्रचंड गर्दी होते. याशिवाय श्रीगणेश जन्मोत्सव इथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यावेळीही मोठी यात्रा भरते. हा गणपती नवसाला पावतो अशी भाविकांची श्रद्धा आहे.