जळगाव जिल्हा पर्यटन

पितळखोरे लेणी

पितळखोरे लेणी

  • चाळीसगाव, जिल्हा जळगाव
  • 1 दिवस
  • 35 कि.मी. चाळीसगाव पासून
  • 3+ वय
  • लेणी

पितळखोरे हा प्राचीन लेणीसमूह जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरापासून सुमारे 35 कि.मी. अंतरावर आहे. राजा सातवाहनांची राजधानी प्रतिष्ठान (पैठण) ते नालासोपारा हा अतिप्राचीन रहदारीचा प्रमुख मार्ग पितळखोऱ्याहून जात होता. त्यामुळेच लेणी कोरण्यासाठी या जागेची निवड अतिशय योग्य वाटते.

  • 'महामायुरी' या बौद्ध ग्रंथामध्ये 'शकरीन' हा यक्ष 'पितलिंगया' येथे राहतो, असा उल्लेख आढळतो. पितलिंगया म्हणजे आताचे पितळखोरे असे अभ्यासक म्हणतात.
  • लेणी खोल व अरुंद दरीच्या दोन्ही काठांवरील दगडात कोरलेली आहे.
  • लेण्यांचे पाण्याच्या प्रवाहामुळे दोन भाग झाले आहेत.
  • एका भागात क्र. १ ते ९ व दुसऱ्या भागात क्र. १० ते १२ लेणी आहेत. दोन्ही गटांतील लेणी एकामेकांसमोर आहेत. येथून एक मार्ग छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) कडे जातो.
  • इंग्रज शास्त्रज्ञ विल्सन फर्ग्युसन व बर्जेस यांनी ही लेणी प्रथम लोकाभिमुख केली.
  • पुरातत्त्वीय संशोधनावरून ही लेणी दुसऱ्या शतकाच्या जवळपास वापरात होती. नंतर पुन्हा पाचव्या सहाव्या शतकात येथे वर्दळ सुरू झाली. वरील दोन्ही काळ अनुक्रमे सातवाहन व वाकाटकांचे होते.
  • लेण्यांच्या प्रवेशद्वाराला अकरा पायऱ्या आहेत. उजव्या बाजूस हत्तींची रांग आहे. जणू काही लेण्यांचा सर्व भार हे हत्तीच पेलत आहेत असा भास होतो. प्रवेशद्वाराचा पट्टा अर्धकमळ व त्रिरत्नांच्या नक्षीने सजविला आहे. या दरवाजाच्या दोन्ही बाजूस दोन द्वारपाल रुबाबात उभे आहेत.

  • द्वारपालाच्या वरच्या बाजूस हत्तीचे शिल्प आहे.
  • उजव्या हत्तीच्या वर किन्नराचे शिल्प आहे.
  • या लेणीतील काही गुहा दुमजली आहेत. वर जाण्यास भुयारातून पायऱ्या खोदलेल्या आहेत.
  • मुख्य गुंफा म्हणजे एक मोठा चैत्य आहे.
  • मधल्या भागात ३५ स्तंभ असून त्यावर धवल, कृष्ण, रक्त आणि तपकिरी वा पिंगट रंगात रंगविलेली बौद्ध संन्याशांची चित्रे आहेत.
  • भोवतालच्या दालनातील छत सिंहासनाधिष्ठित आणि छत्रधारी बुद्धप्रतिमा चितारून सजवले आहे.
  • मुंडण केलेल्या व गुडघे टेकून वंदन करणाऱ्या मुलांच्या प्रतिमादेखील रंगवलेल्या आहेत.
  • स्त्री-पुरुष यांच्या आकृतीही येथे दिसतात.
  • चैत्य लेणी क्र. ३, विहार लेणी क्र. ४ यांच्या दर्शनी भागात गन्धिक कुलातील मितदेव आणि पैठणच्या संघकपुत्र यांचे दानलेख आहेत.
  • विहार लेणी क्र. ४ येथील गजथर हा प्राचीन भारतीय वास्तुशिल्पातील चौथऱ्यावर दाखविलेला पहिला गजथर आहे. हे हत्ती अलंकारयुक्त असून त्यांच्या दोन्ही बाजूंना घंटा लोंबताना दिसतात.
  • या लेण्यांतील एक अप्रतिम शिल्प म्हणजे राजा-राणी शिल्प होय.
  • या राजदंपतीस भारतीय शिल्पकला क्षेत्रात एक आगळे-वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
फोटो गॅलरी
पितळखोरे लेणी
Scroll