पाटणादेवीचे प्रसिद्ध मंदिर चाळीसगाव शहरापासून २६ कि.मी. अंतरावर आहे. जंगलातील पाटणादेवीच्या पुरातन मंदिरामुळे हे ठिकाण भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे.
पाटणादेवीला जाण्यासाठी चाळीसगाव येथील बसस्थानकावरून बस उपलब्ध आहे.
वन विभागाने जंगलात बांधलेल्या विश्रामगृहांमुळे पर्यटकांची राहण्याची सोय होऊ शकते.
मंदिराच्या तिन्ही बाजूंना असलेले अर्धचंद्राकार पर्वताचे उंच कडे, डोंगरातून खळखळून वाहणारे ओढे यांनी हा परिसर नटलेला आहे.
पाटणादेवी मंदिरासह या परिसराला ऐतिहासिक वारसा देखील लाभलेला आहे.
या मंदिरातील चंडिकादेवी ही सप्तशृंगी देवीची बहीण मानली जाते. 'देवीभागवत' या ग्रंथातील शक्तिपीठाच्या कथेनुसार या ठिकाणी वरदहस्त (उजवा हात) खंडित झाला आहे. त्यामुळे येथे वरदहस्त शक्तिपीठाची स्थापना झाली आहे. देवीची मूर्ती नऊ फूट उंचीची, अष्टादशभुजा आहे. पुराणातील कथेनुसार चंड व मुंड या दैत्यांचा देवीने वध केला. त्यामुळे देवीचे नाव चंडिका असे आहे.
संत जनार्दन चरित्रानुसार, शके ११५० (इ.स.१२२८) मधील आषाढी अमावास्या व सूर्यग्रहण असलेल्या दिवशी पाटणादेवीचे मंदिर जनतेसाठी खुले केले गेले. या मंदिराच्या परिसरात भारतीय गणितज्ज्ञ भास्कराचार्यांनी गणिताशी संबंधित विविध संकल्पना मांडल्या आणि गणितशास्त्राची खऱ्या अर्थाने प्रगती झाली.
चंदनाचे आगर म्हणून ओळख असेलल्या जंगलात विपुल वनसंपदा आहे.
वन विभागाच्या प्रवेशद्वारापासून मंदिराकडे जाताना उजव्या हाताला हेमाडपंती महादेव मंदिर पाहण्यासारखे आहे.
डोंगरावरून खळखळ वाहणारे धवलतीर्थ व केदारकुंड हे धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात. याशिवाय जंगलात घनदाट झाडीमध्ये असलेले केदारेश्वराचे प्राचीन मंदिर, उभा गणपती, मद्रासी बाबांची कुटिया, पाटणादेवीच्या मंदिरापासून डोंगरावरून तीन किलोमीटरवर असलेली पुरातन पितळखोरे लेणी, सीतान्हाणी, शृंगार चावडी लेणी, नागार्जुन कोठी, वन विभागाचे निसर्ग वाचन केंद्र इ. ठिकाणे येथे आहेत.
वन विभागाने ठिकठिकाणी केलेल्या 'वॉच टॉवर'वरून जंगलाचा देखावा न्याहाळता येतो.
वन विभागाने जंगलात बांधलेल्या विश्रामगृहांमुळे पर्यटकांची राहण्याची सोय होऊ शकते. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयात रीतसर नोंदणी करता येते. याशिवाय पाटणा निवासिनी चंडिकादेवी प्रतिष्ठानने प्रशस्त जागेवर भक्तनिवासही बांधलेले आहे.
नवरात्रोत्सव काळात वन विभागाने जंगलातील वन्यप्राण्यांना रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांपासून धोका उद्भवू नये, यासाठी प्रवेशद्वाराजवळच वाहनथांबा केलेला आहे. येथून भाविकांना वन विभागाच्या बसद्वारे मंदिरापर्यंत जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.